तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेने ताब्यात घेतलेल्या भारतीय मच्छिमारांची सुटका सुनिश्चित करण्याची विनंती एका पत्रातून केली आहे.
एम. के. स्टॅलिन यांच्या पत्रात काय?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेने ताब्यात घेतलेल्या भारतीय मच्छिमारांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी एक पत्र लिहिले आहे. ज्यात श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छिमारांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे. त्यांच्या नौकाही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
भारतातील अनेक मच्छिमारांना त्यांच्या नौकांसह श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट निर्माण झालेले असून परिवारामध्ये चिंतेचं वातावरण आहे. २१ मार्च रोजी श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील ३२ मच्छिमारांना पकडले आणि त्यांच्या पाच नौका जप्त करण्यात आल्याचे त्यांनी या पत्रातून सांगितले आहे. तरी या गंभीर प्रकरणात मच्छिमारांची सुरक्षा निश्चित करणे गरजेचे असून कोणताही विलंब न करता तत्काळ आवश्यक कारवाई करून त्यांना सहकार्य करावे. ज्यांना श्रीलंकेच्या न्यायालयाने शिक्षा दिली आहे त्यांना आवश्यक कायदेशीर सहाय्य प्रदान करावे, असं या पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी पुढे लिहिलं “मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या सर्व मच्छिमारांची आणि त्यांच्या नौकांची तात्काळ सुटका करा आणि श्रीलंकेने अटक केलेल्या मच्छिमारांना आवश्यक कायदेशीर सहाय्य मिळवून द्या.”
नेमकं काय प्रकरण आहे?
दरम्यान,आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. कारण दोन्ही देशांमधील मच्छिमारांसाठी येथील सागरीपट्टा हा मासेमारीसाठी समृद्ध आहे. याठिकाणी पाण्याची अरुंद पट्टी असल्याने येथे विविध मासे सापडतात. यामुळे मासेमारी करण्याकडे इथे मत्स्यव्यवसाय करणाऱ्या दोन्ही देशांतील मच्छिमारांचा ओढा असतो. दरम्यान,केंद्र सरकारकडे गेल्यावर्षी ३५ ट्रॉलर्ससह २४० भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या सागरी पट्ट्यातील पाण्यातून अटक करण्यात आल्याची नोंद आहे.