करोनामुळे केरळमधील परिस्थिती गंभीर आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून केरळ वेगळ्याच घटनांमुळे चर्चेत आहेत. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद असल्यानं मद्यपींनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात केरळमध्ये घडल्या. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्याकडं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल त्यांना दारू देण्यात यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
करोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
राज्यात विविध भागात मद्यपींच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी दारूचं व्यसन जडलेल्यांना दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल अशा मद्यपींना दारू विक्री करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर दारूच्या आहारी गेलेल्यांना मोफत उपचार करण्यात यावे असंही म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे दारूच्या टंचाईमुळे काही नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकार ऑनलाईन दारू विक्रीच्या पर्यायाचा विचार करत आहे, असंही विजयन यांनी सांगितलं.
Kerala govt also has asked Excise Dept to provide free treatment to and admit people with withdrawal symptoms to de-addiction centers. CM had said that the govt is also considering option of online sale of liquor as the sudden unavailability of alcohol may lead to social problems https://t.co/yQjTXADNeM
— ANI (@ANI) March 30, 2020
केरळमध्ये शनिवारी मल्लपूरम जिल्ह्यात दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दखलपात्र बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.