Delhi Ministers Portfolio: दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला असून, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी रामलीला मैदानावर भाजपा आमदार रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. रेखा गुप्ता यांच्यानंतर, उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी प्रवेश वर्मा, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, पंकज सिंग, आशिष सूद आणि रवींद्र इंद्रराज यांना मंत्रीपदाची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रेखा गुप्ता सचिवालयात पोहोचल्या आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. रेखा गुप्ता दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. रेखा दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वित्त, महिला आणि बाल विकास खाते मुख्यमंत्र्यांकडे

दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्रीमंडळाचे खातेवाटप केले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी वित्त, नियोजन, महिला आणि बाल विकास यासह इतर मंत्र्यांना न दिलेली खाती त्यांच्याकडेच ठेवली आहेत. तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या परवेश वर्मा यांना सार्वजनिक बांधकाम, विधिमंडळ व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत. दरम्यान गृह, नगरविकास आणि शिक्षण ही खाती आशिष सूद यांच्याकडे देण्यात आली आहेत.

कपिल मिश्रा, मनजिंदर सिंग सिरसांकडे कोणते खाते?

दुसरीकडे काही वर्षांपूर्वी अकाली दलातून भाजपात आलेल्या सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांना अन्न आणि पुरवठा खाते देण्यात आले आहे. रविंदर इंद्रराज हे समाज कल्याण आणि सहकार खाते सांभाळणार आहेत. कपिल मिश्रा हे कायदा आणि न्याय, कामगार, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री असणार आहेत. डॉ. पंकज कुमार सिंह यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वाहतूक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

५०,००० दिल्लीकरांची उपस्थिती

दरम्यान आज दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील एनडीएचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावली होती. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे ५०,००० दिल्लीकरांनी रामलीला मैदानावर हजेरी लावली होती.