Revanth Reddy on telangana govt declining Rs 100 crore funding from Adani Foundation : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील सरकारी वकिलांनी केला. अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केल्याचा आरोप आहे. दरम्यान या आरोपांचे पडसाद भारतातील राजकारणात देखील पाहायला मिळत असून या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप होत असतानाच तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने अदाणी फाउंडेशनने देऊ केलेली १०० कोटींची देणगी नाकारली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोमवारी याबद्दल माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेलंगणाचे विशेष मुख्य सचिव आणि औद्योगिक प्रोत्साहन, उद्योग आणि वाणिज्य विभागाचे आयुक्त जयेश रंजन यांनी डॉ. प्रीती अदाणी यांना यासंबंधी पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “तुमच्या फाउंडेशनकडून यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीला १०० कोटी रुपये देऊ केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मात्र विद्यापीठाला कलम ८०जी अंतर्गत आयटी सूट मिळालेली नसल्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणत्याही देणगीदारांना निधीचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्यास सांगितले नाही. जरी या सुटीसंबंधीचा आदेश नुकताच आला असला तरी, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सद्य परिस्थिती आणि भविष्यात उद्भवू शकणारे वाद लक्षात घेता निधी हस्तांतरित करू नये असे निर्देश दिले आहेत”.

तेलंगणाचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

अदानी यांच्यावर अमेरिकेत आरोप झाल्यानंतर तेलंगणा सरकार आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर भारत राष्ट्र समिती आणि भाजपकडून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांनी सोमवारी स्पष्ट केले की, “तेलंगणाचा सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी, तसेच मी आणि माझ्या कॅबिनेटमधील सहकाऱ्यांना अनावश्यक वादापासून दूर ठेवण्यासाठी, आम्ही अदाणींची देणगी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणाकडून एक रुपयादेखील घेतला नाही”.

हेही वाचा>> Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

गेल्या आठवड्यात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत बोलताना अदाणींवर झालेल्या आरोपांच्या संदर्भात राज्यात कुठलीही अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाईल असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता तेलंगणा सराकरने अदाणी फाउंडेशनची देणगी नाकारली आहे. आंध्रप्रदेशमध्ये काही एनडीए नेत्यांनी माजी मुख्यमंत्री वाएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना चंद्राबाबू नायडू यांनी देखील वायएसआरसीपी सरकारविरोधात होत असलेल्या आरोपांमुळे आंध्र प्रदेशच्या ब्रँड इमेजला धक्का पोहचला असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm revanth reddy on telangana govt declines rs 100 crore funding from adani foundation adani bribery case rak