बंगळुरू : बंगळुरूमधील ‘रामेश्वरम कॅफे’मध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले. या घटनेतील संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. शहरातील या लोकप्रिय कॅफेमध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी झालेल्या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भाजपाकडून बॉलिवूडसह भोजपुरी, दाक्षिणात्य आणि बंगाली कलाकारांना लोकसभेची उमेदवारी; वाचा यादी

शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री जी परमेश्वर आणि गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी सिद्धरामय्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्फोटासाठी जबाबदार असलेल्या समाजकंटकांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितले. गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यासारख्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी या स्फोटाचा तपास वेगाने पूर्ण करण्यास त्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ, क्रिकेट स्टेडिमय, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा >>> घराणेशाहीला निवडणुकीची भीती; पंतप्रधान मोदी यांची बिहारमधील सभेत राजद, काँग्रेसवर टीका

शनिवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. या स्फोटातील दोषीच्या हालचाली कॅमेरामध्ये कैद झालेल्या असल्यामुळे, त्याला पकडणे सोपे असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या स्फोटामागे कोणत्याही संघटनेचा हात आहे का हे अद्याप समजले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेतील संशयिताकडे एक पिशवी होती. त्याने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी टोपी घातली होती आणि चेहरा झाकला होता. दरम्यान, या बॉम्बस्फोटाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे (सीसीबी) सोपवण्यात आला असल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी शनिवारी दिली. चौकशीसाठी धारवाड, हुबळी आणि बंगळूरुमधून चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासंबंधी ‘एक्स’वर अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सर्व जखमी बरे होत असून तपास वेगाने सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm siddaramaiah directed officers to make effective use of technology to investigate bengaluru rameshwaram cafe blast zws