उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. या बातमीनंतर ट्विटवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे.
ट्विटरवर #YogiAdityanath हा हॅशटॅग सकाळपासूनच ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याचबरोबर योगी यांच्या समर्थकांनी #Yogiroxx म्हणजेच योगींनी कमाल केली अशा अर्थाचा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. यापैकी #YogiAdityanath या हॅशटॅगवर योगी सरकारच्या राज्यात घडलेल्या या एन्काउंटरवरुन दोन्ही बाजूची मते मांडली जात आहेत. आठ पोलिसांचा खात्म केल्याबद्दल काही जणांनी योगी सरकारचे आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे कौतुक केलं आहे. तर विरोधकांनी यावरुन सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेवर टीका केली आहे. दुबेचे राजकीय लागेबांधे लपवण्यासाठी त्याला चौकशी आधी ठार करण्यात आल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला आहे.
नक्की पाहा >> हैदराबाद ते कानपूर: फिल्मी स्टाइल एन्काउंटरची खरीखुरी उदाहरणे
तर योगी आणि भाजपा समर्थकांनी आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दुबेचा खात्मा केल्याबद्दल सरकारचे आणि पोलिसांचे अभिनंदन केलं आहे. #Yogiroxx हा हॅशटॅग वापरुन अगदी योगींच्या जुन्या भाषणातील काही क्लिप्स, मिम्सच्या माध्यमातून योगींचे कौतुक केलं जात आहे. या हॅशटॅगवर योगी सरकारच्या नेतृत्वाखाली अगदी पद्धतशीरपणे पोलिसांच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या दुबेचा खात्मा केल्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे योगी यांनी या प्रकरणाबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. या चकमकीसंदर्भात आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. विरोधकांबरोबरच शहीद झालेल्या आठ पोलिसांच्या नातेवाईकांनाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुबे याच्या एन्काउंटरच्या बातमीनंतर आता विरोधकांनाही दुबेला पाठिंबा देणार कोण आहेत हे आता समजू शकणार नाही असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट केले आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.