Yogi Adityanath On Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असं आमदार अबू आझमी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले. एवढंच नव्हे तर विरोधकांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन करत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अबू आझमी यांच्या विधानाचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशमध्येही पाहायला मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमी यांच्या विधानावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांना चांगलंच सुनावलं आहे. “कंबख्तको उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाचे लोक औरंगजेबला आपला हिरो मानत असल्याचा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी केला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काय म्हटलं?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, “अबू आझमी यांना (समाजवादी) पक्षातून काढून उत्तर प्रदेशला पाठवा. आम्ही त्यांचा इलाज करू, समाजवादी पक्षाने एकीकडे महाकुंभमेळ्याला दोष दिला आणि आता देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेब सारख्या व्यक्तीची प्रशंसा समाजवादी पक्षाच्या एका आमदाराकडून होते, तरीही समाजवादी पक्षाकडून त्या विधानाचा निषेध का केला जात नाही?”, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.

अबू आझमी यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही”, असं विधान अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.

अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं

अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर टीका झाली. यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं. ते म्हणाले की, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा, यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी. मी औरंगजेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केलं होतं. परंतु, त्या वक्तव्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब व्हायला नको होतं. विधीमंडळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. जनतेची कामं प्रलंबित आहेत. विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो”, असं म्हणत अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं.

अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचं निलंबन

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली. भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत.