Yogi Adityanath On Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याच्या प्रकरणावरून राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून चांगलंच राजकारण तापलं असून कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे, तर कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देत कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच कुणाल कामराच्या गाण्यावरील वादावार राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणावरही वैयक्तिक हल्ला करावा”, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचल्याच्या वादावर भाष्य केलं. योगी आदित्यनाथ यांना या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला असता योगी आदित्यनाथ म्हणाले की, “तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. पण दुर्दैवाने काही लोक समाजात आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत”, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कुणालाही समाज तोडण्याची किंवा विशिष्ट व्यक्तीवर अशोभनीय टिप्पणी करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

कुणाल कामराच्या वादावर फडणवीस काय म्हणाले होते?

“स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने दाखवून दिलं. अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

‘कायदेशीर कारवाई केली जाईल’

“स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे. एखादा कॉमेडीयन अशा प्रकारे गद्दार म्हणू शकत नाही. मात्र, जर जाणूनबुजून कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.