देशभरात आज बकरी ईद उत्साहात साजरा केली जात आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेश सरकारने अनेक सूचना केल्या आहेत. उघड्यावर कुर्बानी देऊ नका, गटारात रक्त सांडू नका हे सांगतानाच कुर्बानी देणाऱ्या जनावराबोबर सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. गतवर्षी कुर्बानीच्या आधी आणि कुर्बानीनंतर सेल्फी घेण्याचे प्रमाण मोठे होते. सेल्फी घेतल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर ते छायाचित्र अपलोड केले होते. यातील अनेक छायाचित्रे ही भयावह होती.
उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंग दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि प्रशासनाला या सूचना केल्या. यासाठी सायबर सेलच्या एका पथकाला सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बकरी ईदरम्यान अधिकाऱ्यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी व वीज आणि पाण्याचा योग्य पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.
बकरी ईदपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत पोलीस-प्रशासनाला बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी दिली जात आहे का, याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते.