आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी कॉंग्रेसप्रणीत यूपीए सरकारने सवलतींचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. स्वयंपाकाचे अनुदानित गॅस सिलिंडर नऊवरून १२ करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने सोमवारी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांनी, तर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाइप गॅसच्या दरातही पाच रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा दिल्ली, अहमदाबाद शहरांना लाभ मिळणार असला तरी मुंबईतील सीएनजीच्या दरात कपात होणार नसल्याचेही पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यूपीए सरकारच्या काळात महागाईने सर्वसामान्यांना चांगलेच सतावले असल्यामुळे कॉंग्रेसवर चौफेर टीका होत आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे दिल्लीतील ‘आप’ सरकारने केंद्रावर टीकेची झोड उडवली होती. तर शहरातील रिक्षाचालकांनीही संपाचा इशारा दिला आहे. यामुळे केंद्र सरकारची अडचण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्राने सीएनजी आणि पाइप गॅसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी सीएनजीच्या तसेच स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइप गॅसच्या दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वीरप्पा मोईली यांनी दिली. गॅसचे दर कमी करण्याच्या निर्णयामुळे गॅस वितरक कंपन्यांनाही त्याचा फायदा मिळेल. एकूणच घरगुती गॅस स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे मोईली यांनी स्पष्ट केले.
पेट्रोलियम सचिव विवेक राय यांनी सांगितले की, सरकारचा हा निर्णय सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर एक दोन दिवसांत कार्यान्वित करण्यात येईल. तसेच घरगुती गॅसच्या पुरवठय़ामध्ये वाढ करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा