कोळसा खाणवाटप गैरव्यहारप्रकरणी बुधवारी विशेष न्यायालायाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात समन्स जारी केले. सिंग यांच्याबरोबर उद्योजक कुमार मंगलम, कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव पीसी पारेख आणि हिंदाल्को समुहाच्या तीन अधिकाऱ्यांविरोधातही समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात विशेष सरकारी वकील व्ही.के. शर्मा यांनी न्यायालयाला याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचे सांगितले होते. याप्रकरणातील चौकशी पूर्ण झाली असून आम्ही न्यायालयापुढे  यापूर्वी कधीही सादर न झालेली कागदपत्रे सादर करत असल्याचे म्हटले होते. तपासादरम्यान, आम्ही आणखी एका साक्षीदाराची चौकशी केली असून, त्याची साक्ष सीलबंद लिफाफ्यात सादर करत असल्याचे व्ही.के. शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले होते.