कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहारांप्रकरणी सीबीआयने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार टी. के. ए. नायर यांची चौकशी केली. नायर यांना पाठवण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या छाननी समितीने नाकारल्यानंतरही तालाबिरा येथील कोळसा ब्लॉक हिंदाल्को कंपनीला देण्यात आल्याप्रकरणी नायर यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. येत्या आठवडय़ात सीबीआयला कोळसा खाण वाटप घोटाळय़ाप्रकरणी कागदपत्रे सादर करावयाची आहेत. या पाश्र्वभूमीवर नायर यांना प्रश्न पाठवण्यात आले होते. त्याची त्यांनी उत्तरे दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
२००६ ते २००९दरम्यान पंतप्रधानांकडे कोळसा मंत्रालयाचा कार्यभार असताना राबवण्यात आलेल्या खाण वाटप धोरणाबाबतही नायर यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोळसा खाणींच्या लिलावास विलंब लागण्याची कारणे, कोळसा फाइलींचे बेपत्ता होणे आणि हिंदाल्कोला तालाबिराची कोळसा खाण देण्याच्या वेळच्या घडामोडी याबाबतही नायर यांना सीबीआयने प्रश्न विचारले आहेत. हिंदाल्को खाणवाटप प्रकरणी तत्कालिन कोळसा सचिव पी. सी. पारेख आणि आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्यावर सीबीआयने आधीच गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader