कोल इंडियाच्या सुमारे २७ कोळसा खाणींतून अद्याप उत्पादनाला सुरुवात झालेली नाही. कोळशाच्या साठय़ांनी समृद्ध असलेल्या परिसरातून सुमारे १२०० दशलक्ष टन कोळसा उत्पादित केला जाऊ शकतो, असे संसदेत गुरुवारी सांगण्यात आले.
कोळशाचे उत्पादन काढू न शकलेल्या सुमारे २७ कोळसा खाणी सध्या कार्यवाहीविना तशाच पडून आहेत, अशी माहिती कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. वैधानिक मंजुऱ्या, जमीन संपादन, कंत्राटदारांची नेमणूक, तसेच अवघड भूखनन स्थिती आणि पायाभूत सुविधा केंद्रांचा विकास अशा प्रमुख कारणांमुळे ‘कोल इंडिया’च्या खाणीमधून उत्पादन सुरू झालेले नाही. तथापि, सद्य:स्थिती कोळसा खाणी अंमलबजावणीच्या वेगळ्या टप्प्यावर असल्याचे गोयल म्हणाले.
२७ कोळसा खाणींपैकी पाच खाणी पश्चिम बंगालमध्ये, तीन झारखंड, सात छत्तीसगढ, चार ओदिशा आणि आठ महाराष्ट्रात आहेत. कोलकाता कोळसा नियंत्रकांच्या माहितीनुसार, विविध कंपन्यांना वाटप करण्यात आलेल्या १७८ बंदिस्त कोळसा खाणींमध्ये अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. विविध स्तरांवर वैधानिक मंजुऱ्या न मिळाल्याने या खाणींमध्ये उत्पादन होऊ शकले नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. २१८ कोळसा खाणींपैकी २०४ खाणींचे झालेले वाटप सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal india has planned output of 1 billion tonnes by 2020 piyush goyal