आदित्य बिर्ला समूहाच्या हिंदाल्को कंपनीला तालबिरा-२ ही कोळसा खाण दिल्याप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना विशेष न्यायालयाने आरोपी म्हणून पाचारण केले त्याविरुद्ध डॉ. सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
हिंदाल्कोचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला आणि कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी. सी. परख यांनाही आरोपी म्हणून पाचारण करण्यात आल्याने त्यांनीही या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी डॉ. सिंग यांना ७ एप्रिल रोजी या प्रकरणातील आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायाधीशांनी सारासार विचार करून हा निर्णय घेतलेला नसल्याने समन्स रद्द करावे, असे माजी पंतप्रधानांचे म्हणणे आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखालील चमूने डॉ. सिंग यांच्या वतीने याचिका केली असून, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.
डॉ. सिंग यांच्यावर बजावण्यात आलेले समन्स अयोग्य आहे, हे अनेक आधाराने सिद्ध करता येईल, असे आणखी एका वकिलाने सांगितले.
डॉ. मनमोहनसिंग यांनी गुन्हा केला आहे असे सिद्ध करणारी कोणतीही नोंद नाही, असेही याचिकेत म्हटले आहे. सक्षम अधिकारी या नात्याने डॉ. सिंग यांनी ओदिशा सरकारच्या प्रतिनिधित्वावरून तालबिरा-२ ही खाण हिंदाल्कोला देण्याचा निर्णय घेतला, असेही याचिकेत म्हटले आहे.
निर्णयप्रक्रिया सदोष असण्याची शक्यता आहे, मात्र सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. सरकारमध्ये निर्णय घेणे हा गुन्हा नाही, असेही एका वकिलाने सांगितले.