कोळसा खाणीवाटप घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास नव्याने स्थितिदर्शक सीलबंद अहवाल सादर केला. या घोटाळ्यासंबंधी सध्या सुरू असलेले तपासकाम, विविध उद्योगांचा त्यामध्ये असलेला सहभाग, अन्य बडे उद्योजक तसेच नोकरशहांचा या घोटाळ्याशी काय संबंध आहे, यासंबंधीची सर्व माहिती सदर अहवालाद्वारे न्यायालयास देण्यात आली.
उद्योगपती कुमारमंगलम् बिर्ला, त्यांच्या आधिपत्याखालील हिंडाल्को कंपनी तसेच कोळसा विभागाचे माजी सचिव पी. सी. पारख यांच्याविरोधात सादर करण्यात आलेल्या प्रथमदर्शी आरोपपत्रासंबंधीही या अहवालामध्ये माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हिंडाल्को कंपनीस वाटप करण्यात आलेल्या कोळसा खाणीप्रकरणी असलेले सर्व दस्तावेज आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र सीबीआयने मंगळवारी पंतप्रधानांच्या कार्यालयास पाठविले.
या प्रकरणी सीबीआयने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. यासंदर्भात आपल्याला काहीही दडवायचे नाही आणि सीबीआयला हवे असलेले हजारो दस्तावेज त्यांना याआधीही देण्यात आले आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी स्पष्ट
केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा