भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे जोरदार समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी हे विधेयक फायदेशीर असून, विरोधकांच्या अपप्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तसेच यूपीए सरकारच्या काळातील कोळसा खाण घोटाळ्याची व्याप्ती कल्पनेपेक्षाही मोठी असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
शहीद दिनानिमित्त हुतात्मा भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांना आदरांजली वाहण्यासाठी फिरोझपूर जिल्ह्य़ात त्यांच्या स्मारकाध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी भूसंपादन विधेयकावरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. देशाने जर प्रगती केली तर शेतकऱ्यांना फायदा होईल. अनेकांना रोजगार मिळेल. जर विकासच झाला नाही तर तुमच्या मुलांचे काय होईल? याचा विचार करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मुंबई, दिल्लीतील झोपडपट्टय़ांमध्येच राहणार काय, असा सवाल त्यांनी केला.

घोटाळ्याची व्याप्ती मोठी
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील कोळसा खाणवाटप घोटाळ्याची व्याप्ती १.७६ लाख कोटींपेक्षाही अधिक असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. घोटाळ्याची रक्कम अवाजवी फुगवल्याचा युक्तिवाद काही जण करतात. मात्र आमच्या सरकारने २४० कोळसा खाणींपैकी केवळ २० खाणींचे लिलाव केले आहेत. यामध्ये दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यावरून हा घोटाळा केवढा असेल याचा अंदाज करा, असे पंतप्रधानांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे देशाचे नुकसान होत आहे. गेल्या सरकारने २०१४ मध्ये ३०० रुपयांना एक एलईडी दिवा खरेदी केला. आम्ही मात्र तो ८० रुपयांमध्ये घेतला. यावरून याची व्याप्ती लक्षात घ्या, असे सांगत गेल्या सरकारवर टीका केली.

Story img Loader