कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी राज्यसभा सदस्य विजय दर्डा आणि अन्य तिघांविरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केले आहे. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला. विजय दर्डा, त्यांचे चिरंजीव देवेंद्र दर्डा, नागपूर येथील एएमआर आयर्न अ‍ॅण्ड स्टील प्रा. लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज जयस्वाल यांना समन्स जारी करण्यात आले.
सीबीआयने गेल्या २७ मार्च रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खाणी आपल्या ताब्यात घेतल्या, असा आरोप ठेवण्यात आला आहे. कलम १२०-ब (फौजदारी कट), कलम ४२० (फसवणूक) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये या सर्वाविरोधात आरोप ठेवल्याचे स्पष्ट  करण्यात आले. ‘एएमआर आयर्न अ‍ॅण्ड स्टील’ कंपनीने अर्ज दाखल केल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यासंबंधी आपले उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयने आणखी अवधी मागितला आहे.
‘एएमआर आयर्न अ‍ॅण्ड स्टील’ कंपनीच्या वतीने अ‍ॅड. विजय अग्रवाल यांनी बाजू मांडली. सीबीआयने या प्रकरणाचा योग्य तपास केला नसून त्यांचे आरोपपत्र पक्षपाती तपासकामावर आधारित असल्याची तक्रार त्यांनी केली. तर याआधीही आपल्याला पाच कोळसाखाणींचे वाटप झाल्याची बाब ‘एएमआर आयर्न अ‍ॅण्ड स्टील’ कंपनीने जाणूनबुजून दडवून ठेवली होती, असे सीबीआयच्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा