आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी ही आमच्यासाठी मजबुरी नाही तर धर्म असल्याचे भाजपने गुरुवारी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दूर ठेवण्याबाबत एनडीएतील घटक पक्षांचा कोणताही दबाव नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.
आघाडी ही आमच्यासाठी मजबुरी नाही. केंद्रात सत्ता असताना विकासाला प्राधान्य देत किमान समान कार्यक्रम राबवून आमची उपयुक्तता सिद्ध केली आहे. तसेच आघाडीचे स्थिर सरकारही दिले. त्यामुळे आघाडी हा आमच्यासाठी धर्म असल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक शुक्रवारपासून गोव्यात सुरू होत आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना नकवी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
एनडीए आघाडी अधिक मजबूत होणार असून येत्या काही दिवसांत तिचा विस्तार होणार असून त्याबाबत आम्ही लवकरच जाहीर करू, असेही नकवी यांनी स्पष्ट केले.
अयोध्या-प्रश्न आमच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे आम्ही कधीच म्हणालो नव्हतो. मात्र मुद्दय़ांचा क्रम ठरवायचा असेल तर सध्या महागाई, भ्रष्टाचार, अकार्यक्षम प्रशासन यांना आम्ही अधिक प्राधान्य दिल्याचे नकवी यांनी सांगितले.

मोदींबाबत बैठकीत निर्णय नाही- सिन्हा
आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळतील याबाबतच्या निर्णयावर गोव्यात होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. याबाबतचा निर्णय पक्षाच्या संसदीय समितीमध्ये घेतला जाईल आणि हे पक्षाने आधीच स्पष्ट केल्याचे सिन्हा म्हणाले.

Story img Loader