अहमदाबाद/नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दल (आयसीजी), गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) संयुक्त कारवाई करून एका भारतीय मासेमारी नौकेतून १७३ किलो चरस जप्त केले. या कारवाईत दोन खलाशांनाही ताब्यात घेतल्याचे अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. मंगेश आरोटे ऊर्फ साहू आणि हरिदास कुलाल ऊर्फ पुरी अशी दोघांची नावे असून, ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.
गुजरात एटीएस पथकाने रविवारी धाड टाकून पुण्यातून कैलास सानप, द्वारका येथून दत्ता आंधळे आणि मांडवी (कच्छ) येथून अली असगर ऊर्फ आरिफ बिदाना यांना अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात पाच जणांना अटक केल्याची माहिती एटीएसने दिली. प्राथमिक तपासानुसार हे पाचही जण पाकिस्तानस्थित ड्रग सिंडिकेटच्या संपर्कात होते. एटीएस अधिकाऱ्यांना समुद्रामार्गे अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. यासाठी २२-२३ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांनी भारतीय मासेमारी नौका भाड्याने घेण्याचे ठरवले. ही नौका २७-२८ एप्रिल रोजी गुजरात समुद्रात परतणार होती. यानंतर या अमली पदार्थांची देशाच्या विविध भागात विक्री होणार होती.
हेही वाचा >>>राजीनामा दिल्यानंतर दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, “पक्षातील काही समस्या…”
तटरक्षक दल, गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरहून आयसीजीएस सजग जहाजाद्वारे कारवाई सुरू केली आणि रविवारी दुपारी ही बोट पकडली. त्यानंतर बोटीतील आरोटे आणि कुलाल यांच्याकडून ६० कोटी रुपयांचे १७३ किलो चरस जप्त केले.
सानप, आंधळे आणि आरोटे हे बोट खरेदीसाठी द्वारका आणि मांडवी येथे आले होते. त्यांना बोट खरेदी करता न आल्याने त्यांनी स्थानिकाची बोट भाड्याने घेतली.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणात सहा अटकेत
अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आंतरराज्य अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात आणखी ६ जणांना राजस्थानमधून अटक केली. तसेच सिरोही जिल्ह्यात चौथी प्रयोगशाळा शोधून काढत ४५ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
‘एनसीबी’ आणि ‘एटीएस’ने तीन महिन्यांच्या सखोल तांत्रिक आणि पाळत ठेवून केलेल्या तपासानंतर २७ एप्रिल रोजी राजस्थान आणि गुजरातमधून गुप्तपणे अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई करून ३०० किलो अमली पदार्थ जप्त केले व ७ जणांना अटक केल्याचे ‘एनसीबी’चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले.