तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना पाकिस्तानी जहाजाविषयी केलेले वादग्रस्त विधान चांगलेच भोवले आहे. सरकारने त्यांची आग्नेय विभागाच्या मुख्यपदावरून उचलबांगडी केली असून, लोशाली यांची रवानगी आता तटरक्षक दलाच्या गांधीनगर येथील मुख्यालयात करण्यात आली आहे. त्यांनी पाकिस्तानी जहाजाविषयी केलेल्या विधानाचा व्हिडिओ वेगाने प्रसारित झाल्यावर त्यांची चौकशी करण्यात येईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यानंतर सोमवारी त्यांच्या या बदलीवर शिक्कामोर्तब करणारे आदेश देण्यात आले. या ठिकाणी त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याशिवाय, एका त्रिसदस्यीय समितीकडून याप्रकरणाची चौकशी केली जाणार असून चार आठवड्यांमध्ये याचा अहवाल तटरक्षक दलाच्या मुख्यालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती संरक्षणमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. त्यानंतरच लोशाली यांच्याविरुद्ध शिस्तीची अथवा प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे.
लोशाली यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात ३१ डिसेंबर २०१४ला मध्यरात्री भारतीय हद्दीत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेली संशयित पाकिस्तानी नौका आपणच स्फोट करून उडवून देण्यास सांगितले होते. आपल्याला त्यांचा (पाकिस्तानचा) बिर्याणी खायला घालून पाहुचणार करायचा नव्हता, असे सांगत आपण पाकची नौका उडवण्याचे आदेश दिल्याचे विधान लोशाली यांनी केले होते. मात्र, भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाकडून अगदी याउलट माहिती पुरविण्यात आली होती. त्यामुळे लोशाली यांच्या वक्तव्याने नौदल आणि संरक्षण मंत्रालयाची चांगलीच गोची झाली होती. गुजरातच्या सागरी क्षेत्रात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी नौकेचा मुद्दा मध्यंतरी चांगलाच गाजला होता. या एकूणच प्रकारावर संशयाचे मोठे सावट होते. त्यावेळी भारतीय नौदलाकडून पाठलाग सुरू असताना, नौकेवरील लोकांनी स्वत:हून नौका पेटवून किंवा स्फोटकांनी उडवून दिल्याचा दावा भारतीय यंत्रणांकडून करण्यात आला होता. मात्र, त्यावेळीही प्रसारमाध्यमांकडून या घटनेच्या स्वरूपाविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली होती. एखाद्या लहानशा नौकेचा पाठलाग करण्यासाठी नौदलाने एवढ्या ताकदीचा वापर का करावा, हा मुद्दादेखील उपस्थित झाला होता.

Story img Loader