भारतीय सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या २१ मच्छीमारांना गुजरातमधील दाखाऊ बंदरात भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी अटक केली आणि त्यांचे तीन ट्रॉलर जप्त केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हद्दीत मच्छीमारी करताना शुक्रवारी रात्री भारतीय तटरक्षक दलाच्या ‘मीरा वाहन’ या नौकेने अल-हारम, अल-अली आणि अल-घौस या पाकिस्तानच्या तीन नौका ताब्यात घेऊन त्यावरील २१ मच्छीमारांना अटक केली.
सदर नौका आणि मच्छीमारांना शनिवारी ओखा येथे आणण्यात आले आणि त्यांना मरिन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेथे त्यांची राज्य आणि केंद्राच्या गुप्तचर अधिकाऱ्यांमार्फत संयुक्तपणे चौकशी करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या ३७ मच्छीमारांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या चार नौका सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्या होत्या.