देशातील काळा पैसा असण्याच्या निमित्ताने विदेशी बँका सदैव चर्चेत राहिल्या असतानाच भारतातील आघाडीच्या खाजगी बँकांमध्येही काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱ्यात होत असल्याच्या वृत्ताने गुरुवारी तमाम अर्थ जगतात खळबळ उडवून दिली. आपल्या वृत्त-संकेतस्थळाच्या माध्यमातून ही बाब दिल्लीतील एका वार्ताहराने उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यामुळे समोर आलेल्या बँकांनी लगेचच असे प्रकार झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी भूमिका जाहीर करून टाकली.
‘कोब्रापोस्ट.कॉम’ या वृत्तविषयक संकेतस्थळाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्ध बहल या पत्रकाराने राजधानीत बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत आपण संबंधित बँकांच्या शाखांचे अनेक तासांचे चित्रीकरण केल्याचाही दावा केला.
मात्र ते कधी केले अथवा किती रक्कम अशा बँकांमध्ये आहे, हे तो स्पष्ट करू शकला नाही. काळा पैसा अथवा जे उत्पन्न जाहीर केले नाही, अशा रकमेच्या तजविजेसाठी अनेक राजकीय व्यक्तींनी संबंधित बँकांकडे सहकार्य मागितल्याचेही बहल याने सांगितले. संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या चित्रफितीत यासाठी विविध बचत, विमा उत्पादने यांचा आधार घेण्यात आला आहे. अनेक बँकांच्या शाखा, त्यातील वरिष्ठ अधिकारी हे यासाठी अत्यावश्यक कागदपत्रांशिवायही संबंधितांचे खाते सुरू करण्यास आग्रही असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.
बँका चौकशीस तयार
बहल याने चित्रीकरणा दरम्यान भारतातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक व अॅक्सिस बँक यांचा उल्लेख केला आहे. उपरोक्त बँकांनी हे वृत्त प्रसारित होताच चौकशीची तयारी दर्शविली असून येत्या दोन आठवडय़ात नेमकी स्थिती समोर आणली जाईल, अशी भूमिका जाहीर केली आहे. आयसीआयसीआय बँकेने याबाबत म्हटले आहे की, कायदेशीर आणि नियामक पूर्ततेद्वारेच बँकेचे कामकाज होत असते. यासाठी बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य ते प्रशिक्षणही दिले जाते. मात्र याबाबतच्या वृत्तानंतर उच्चस्तरिय चौकशी समिती नेमून दोन आठवडय़ात त्याचा अहवाल जारी करण्यात येईल.
एचडीएफसी बँकेनेही या वृत्ताबाबत चिंता व्यक्त केली असून अशा प्रकरणाची प्राधान्याने चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. निधी जमाबाबतची सर्व प्रक्रिया तपासून पाहण्यात येऊन याबाबत करण्यात आलेला दावाही पडताळून पाहण्यात येईल, असेही बँकेने म्हटले आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची खाजगी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेनेही याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, खाते अथवा निधी जमा रकमेचे सर्व व्यवहार हे बँकेच्या नियमाधीन राहूनच केले जातात. मात्र आता समोर आलेल्या मुद्दय़ाची शहानिशा केली जाणार असून उच्च दर्जाची सेवा आणि व्यवसाय यावर बँकेचा नेहमीच भर असेल, असेही बँकेने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा