कॅनडातील अतिउंचीवरील आक्र्टिक भागात जीवाणूंसाठी अतिशय थंड मानल्या जाणाऱ्या तापमानाला जीवाणूची एक प्रजाती जिवंत स्वरूपात सापडली आहे. एरवी एवढे कमी तपमान मंगळाच्या पृष्ठभागावर असते, त्यामुळे तेथेही जीवाणू तग धरून राहू शकतात असा वैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे.मॅकगिल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी शोधलेला हा जीवाणू एलेसमीअर बेटांवर उणे २५ अंश सेल्सियस तापमानाला सापडला आहे. शनीचा चंद्र असलेला एनसेलाडस व मंगळ या दोन्ही ठिकाणी सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वासाठी नेमक्या काय पूर्वअटी असाव्यात यावर काही महत्त्वाचे धागेदोरे त्यामुळे हाती येऊ शकतात. प्रा. लायल व्हाइट व त्यांच्या सहकारी नादिया मायकिटझुक यांनी शोधलेल्या या नव्या जीवाणूचे नाव ‘हॅलोक्रायोफिलस ओआर १’ असे आहे.
आक्र्टिकमधील किमान २०० सूक्ष्मजीवांची तपासणी करून त्यांना हा असा जीवाणू सापडला की, जो आक्र्टिक पेरमाफ्रॉस्टसारख्या तापमानाला जगू शकतो. एलेसमीअर बेटांवर गोठलेल्या अवस्थेतील गोठलेल्या खारट पाण्यात तो जगला असावा असे व्हाइट यांचे मत आहे. पेरमाफ्रॉस्ट ब्राइन व्हेन्समधील क्षार हे पाणी त्या तापमानाला गोठलेले ठेवतात, त्यामुळे अधिवासानुकूल परिस्थिती बनत असली तरी तेथे टिकून राहणे फार अवघड असते; कारण उणे २५ अंश तापमानला श्वासोच्छवासाची क्रिया अवघड असते. परंतु या जीवाणूंच्या पेशी रचनेत असे काही बदल होतात की ,ज्यामुळे त्यांच्यात थंडीतही टिकून राहण्याची क्षमता निर्माण करणारी प्रथिने तयार होतात. त्यांच्या पारपटलातही बदल होतात. त्यामुळे प्रतिकूल हवामानाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. या जीवाणूंच्या पेशीत काही संयुगे मोठय़ा प्रमाणात बनतात, ज्यामुळे त्यांचा गोठण्यापासून बचाव होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा