पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण
काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला तसेच सर्व विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. परिणामी काश्मीरचा उर्वरित देशाशी असलेला संपर्क तुटला आहे. पहाटेच्या सुमारास हिमवृष्टी सुरू झाल्याने काश्मीर खोऱ्यात जनजीवन विस्कळित झाले. नववर्ष साजरे करण्यासाठी बाहेरून आलेल्या पर्यटकांनी मात्र हिमवृष्टीचा आनंद लुटला.
 अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागात वीज पुरवठा खंडित केला. हिमवृष्टीने  थंडीच्या लाटेपासून मात्र दिलासा मिळाला आहे. काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारा श्रीनगर-जम्मू हा ३०० कि.मी. चा महामार्ग हिमवृष्टीने बंद झाला. जवाहर बोगद्यात दोन फूट हिम साठले आहे, असे वाहतूक खात्याच्या प्रवक्तयाने सांगितले. हवामानात सुधारणा झाल्यास वाहतूक पुन्हा सुरू होईल असे सांगून प्रवक्ता म्हणाला की, काही ठिकाणी सहा इंच ते ३ फूट इतके हिमाचे थर आहेत. हिमवृष्टीने श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे होऊ शकली नाहीत. धावपट्टी स्वच्छ करण्यात आली तरी खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करावी लागली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगरमध्ये दुपापर्यंत सहा इंच हिमथर साचला होता. उंचीवरील भागात सहा फूट हिमथर होता. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे आठ इंच तर पहलगाम येथे दीड फूट हिमथर होता.
पहलगामच्या आजूबाजूच्या भागात तीन फूट हिमथर होता. नववर्ष साजरे करण्यासाठी काश्मीरला आलेल्या लोकांनी हिमवर्षांवामुळे आनंद व्यक्त केला. अनेकांनी कॅमेऱ्यातून हिमवृष्टीची छायाचित्रे टिपली. लडाखमध्ये हवामान तापमान उणे १२ अंश सेल्सियस होते.

Story img Loader