‘पृथ्वीवरील नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला थंडीने चांगलेच गारठवले असून लेह येथे शनिवारी रात्रीचे तपमान उणे १७.३ अंश सेल्सियस इतके घसरले होते. कारगिल शहरही गोठले असून येथे पारा उणे १६.४ अंशांपर्यंत घसरला. यंदाच्या थंडीतील हा पाऱ्याचा नीचांक आहे.
काश्मीर, श्रीनगर, पेहेलगाम, काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वार मानले जाणारे काझीगंद, गुलमर्ग अशा सगळ्याच ठिकाणी पारा शून्याखाली आला आहे. या सर्व भागातील किमान सरासरी तापमान उणे सात अंशांवर आले आहे. या सगळ्याच ठिकाणी पारा अवघ्या एका दिवसात किमान दोन अंशांनी घसरला आहे.
चिल्लई कालन
काश्मीरमध्ये सध्या २१ दिवसांचा तीव्र हिवाळ्याचा कालखंड सुरू आहे. दर वर्षी २१ डिसेंबरपासून हा कालखंड सुरू होतो. ४० दिवसांचा हा कालखंड ‘चिल्लई कालन’ म्हणून ओळखला जातो. या काळात काश्मीर आणि लडाख प्रांतात तापमान प्रचंड घसरते, तसेच काही वेळा बर्फवृष्टीही होते.
येत्या दोन दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता असून या काळात हिमवर्षांव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
उत्तर भारतही गारठला
उत्तर भारतात थंडीचा तीव्र कडाका जाणवण्यास सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीलाही थंडीने पुरते वेढून टाकले आहे. दिल्लीत पारा शनिवारी ४.५ अंशांवर स्थिरावला आणि हिमवाऱ्यांनीही आक्रमण केल्यामुळे थंडाव्याची तीव्रता अधिकच झाली. दिल्लीतील कमाल तापमान १९.५ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले.
हिमाचल प्रदेशातील नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा सामना करावा लागत आहे. सिमला येथे अतिथंड वारे वाहत असून तेथे २.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यात हिमवर्षांवही झाला असून काही सखल, मध्यम व डोंगराळ भागात मोठय़ा पावसाची शक्यताही वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पंजाब व हरयाणात थंडीची तीव्रता वाढली असून हिसार येथे सर्वात कमी म्हणजे उणे ०.८ अंश तापमानाची नोंद झाली. हे तापमान गोठणबिंदूजवळ पोहोचले होते. नारनौल येथेही ०.१ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. पंजाबमधील आदमपूर व जालंधर जिल्ह्य़ात किमान तापमान ०.५ अंश सेल्सियस होते. राजस्थानातही थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे चुरू, माउंट अबू येथे थंडी वाढल्यामुळे दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे उणे ०.५ व उणे एक अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. थंडीच्या तीव्रतेमुळे चुरू येथील पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे.

Story img Loader