नवी दिल्ली : ‘‘निवडणुकीतील यशासाठी सामूहिक नेतृत्व हात एकमेव मार्ग आहे,’’ असे मत काँग्रेसचे नेते व राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी शनिवारी व्यक्त केले. राजस्थान विधानसभा निवडणुकीस काही महिने राहिले असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद विसरण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांनी सांगितले की, ‘‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना ‘माफ करून विसरून पुढे जा’ असा सल्ला दिला होता. खरगे यांचा हा सल्ला म्हणजे आपल्यासाठी पक्षाध्यक्षांनी दिलेला आदेशच आहे.’’ राहुल गांधींनी राजस्थान काँग्रेसनेत्यांसह गेल्या गुरुवारी घेतलेल्या बैठकीत राजस्थान विधानसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पायलट यांनी हे वक्तव्य केले.

या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नसल्याचे संकेत दिले होते. पायलट म्हणाले, की अशोक गेहलोत हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांना अधिक अनुभव आहे. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना सर्वाना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. गेहलोत  यांचाही सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात थोडे कमी-जास्त झाले तर फार गंभीरपणे  घेतले जाऊ नये.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collective leadership is the only option congress in rajasthan sachin pilot ysh