रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठी मध्य प्रदेश सरकारकडून एक अभिनव निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मध्यप्रदेशात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्यास त्यांना पेट्रोल न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावरून दुचाकीस्वारांनी पेट्रोल विक्रेत्यांशी हुज्जत घालू नये, तुमच्यावर नजर ठेवण्यात येत आहे, असा संदेशही जारी केला आहे. त्यामुळे यापुढे मध्य प्रदेशात हेल्मेट न घातल्यास दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावरून गाडीत पेट्रोल न भरताच माघारी परतावे लागेल. मध्यप्रदेशचे अन्न आणि नागरी पुरवठा आयुक्त मनोहर अग्नानींनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी लिखित स्वरूपात कळवले असून या आदेशाचे सक्त पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी भोपाळचे तहसीलदार निकुंज श्रीवास्तव यांनी अशाप्रकारचे आदेश काढले होते. मात्र, या निर्णयानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आता यापासूनच प्रेरणा घेत मध्य प्रदेश सरकारने पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. लवकरच राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर या निर्णयासंबंधी जनजागृती करणारे फलक लावण्यात येणार आहेत. सध्याच्या अहवालांनूसार भारतात प्रत्येक मिनिटाला रस्त्यावरील अपघातांत एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी होत असल्याची माहिती आहे.