मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचा लष्करी गणवेशातील फोटो अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट केला आहे. ‘तुम्हाला पुन्हा लष्करी गणवेशात पाहून आनंद झाला’ या आशयचा संदेशही त्यांनी या फोटोवर लिहीला आहे. अनुपम खेर यांच्या ट्विटमुळे नेटिझन्सनी टीका करायला सुरूवात केली आहे. तर काही नेटिझन्सनी अनुपम खेर यांचे कौतुकही केले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कर्नल पुरोहित यांना ९ वर्षांनी जामीन मिळाला त्यामुळे ते तुरूंगाबाहेर आले आहेत, भारतीय लष्कराने कर्नल पुरोहित यांना निलंबित केले आहे. निलंबनाची ही कारवाई लष्कराकडून त्वरित मागे घेतली जाईल असे नाही. मात्र जामिनावर सुटका झाल्यावर कर्नल पुरोहित हे मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या त्यांच्या युनिटला भेट देण्यासाठी गेले होते. एवढेच नाही तर तळोजा येथील तुरुंगाबाहेर आल्यावर लष्कराच्या दोन कारही तिथे हजर होत्या. या सगळ्यामुळेच कर्नल पुरोहित यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येईल अशी चर्चा रंगली आहे.

असे असले तरीही, कर्नल पुरोहित यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येईल असे कोणतेही अधिकृत वक्तव्य भारतीय लष्कराने केलेले नाही. त्यामुळे कर्नल पुरोहित पुन्हा लष्करात जातील की नाही याची शाश्वती आत्ताच देता येणार नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अभिनेते अनुपम खेर यांनी कर्नल पुरोहित यांचा लष्करी गणवेशातला फोटो ट्विट केला आहे. तळोजा कारागृहातून जामिनावर सुटका होताच आता मला माझ्या कुटुंबात परतायचे आहे. पहिले कुटुंब म्हणजे माझी पत्नी आणि दुसरे कुटुंब म्हणजे लष्कर असे वक्तव्य कर्नल पुरोहित यांनी केले होते. आता अभिनेते अनुपम खेर यांनी तर त्यांचा फोटोच ट्विट केला आहे.

Story img Loader