राज्यातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले जात असून जनतेने चांगल्या सवयी अंगीकाराव्यात यासाठी सरकारने पावले उचलली असल्याचे मोदी म्हणाले. एमएस विद्यापीठाच्या सामाजिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला पाठविलेल्या संदेशात मोदी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
गुजरातमधील ६६ टक्के मुले कमी वजनाची असल्याचे ‘कॅग’च्या अहवालात म्हटले होते. मात्र राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्याने आता ही आकडेवारी २६ टक्क्यांहूनही कमी झाली आहे, असा प्रतिदावा राज्य सरकारने केला.
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेतील शिष्टमंडळांसह भारतातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून ३५० प्रतिनिधी या परिषदेला हजर होते.

Story img Loader