Kunal Kamra All Controversies : कुणाल कामरा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदेंवर गाणं तयार केल्याने त्याने माफी मागावी अशी मागणी केली जाते आहे. मात्र कुणाल कामरा याआधीही वादग्रस्त कॉमेडी केल्याने अशाच प्रकारे कारवाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. जाणून घेऊ त्याबाबत.

कोण आहे कुणाल कामरा?

कुणाल कामरा हा एक स्टँड अप कॉमेडियन आहे. जाहिरात क्षेत्रात अकरा वर्षे काम केल्यानंतर कुणाल कामरा स्टँड अप कडे वळला. २०१७ मध्ये त्याने रमित वर्माच्या साथीने Shut Up Ya Kunal हे पॉडकास्ट सुरु केलं होतं. या कार्यक्रमात कुणाल कामरा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसंच प्रसिद्ध व्यक्तींशी अनौपचारिक गप्पा मारत असे. त्यानंतर तो स्टँड अप करु लागला. वाद आणि कुणाल कामरा असं समीकरणच होऊन बसलं.

२०१८ मध्ये काय घडलं?

कुणाल कामरा हा त्याच्या राजकीय भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले. २०१८ मध्ये कुणालने त्याचं ट्विटर (आत्ताचं एक्स) अकाउंटच डिलिट केलं होतं. मुस्लिम, शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीटस व्हायरल झाल्यानंतर कुणाल कामराने त्याचं ट्विटर अकाऊंट डिलिट केलं होतं आणि मुंबईतलं घरही सोडलं होतं. तो गुडगाव या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता. २०१९ मध्ये कुणाल कामराला त्याचे दोन शो रद्द करावे लागले होते. काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती.

२०२० मध्ये कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी यांचा वाद

कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुणाल कामराने अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले. मात्र, अर्णब गोस्वामी कुणालकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये आपलं काम करत राहिले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला. यानंतर झालेल्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये कुणालने अर्णब गोस्वामीच्या शांत राहण्याचीही यथेच्छ खिल्ली उडवली. या दोघांमधला वाद टोकाला गेला होता. तसंच इंडिगोने कुणाल कामरावर सहा महिने बंदी घातली होती. तसंच सरकारी विमान कंपनी एअर इंडियानेही कुणाल कामरावर बंदी घातली होती. स्पाइसजेटनेही असाच निर्णय तेव्हा घेतला होता.

shiv sena became aggressive over kunal Kamras song on eknath shinde vandalizing Khars Unicontinental hotel
कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला.file photo

सर्वोच्च न्यायालय विरुद्ध कुणाल कामरा

कुणाल कामराने नोव्हेंबर २०२० या महिन्यात सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. तसंच अर्णबच्या प्रकरणात माफी मागणार नाही असंही म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली ट्वीट डिलिट कऱण्यासही नकार दिला होता. त्यामुळेही कुणाल कामरा विरुद्ध सर्वोच्च न्यायालय यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं.

ओला कंपनी विरुद्ध कुणाल कामरा

ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कुणाल कामरा यांच्यातलाही वाद सर्वश्रुत आहे. कुणाल कामराने ओला कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या तक्रारी समजून घेण्यात कमी पडत आहे असं म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन हा वाद झाला होता. कारण सोशल मीडियावर या दोघांचे ट्वीट व्हायरल झाले होते.

आणखी कशामुळे वादात अडकला आहे कुणाल कामरा?

कुणाल कामरा हा कायमच मोदींच्या विरोधात टीका करताना दिसतो. त्यामुळे तो एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होतो आहे. दरम्यान २०१९ मध्ये भाजपाला लोकसभा निवडणुकीत जो विजय मिळवला होता त्यावरुनही त्याने भाजपाची खिल्ली उडवली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुकेश अंबानी यांचीही खिल्ली उडवली होती.

कुणाल कामरा पुन्हा का चर्चेत?

वादांशी जुनं नातं असलेला कुणाल कामरा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण त्याने एकनाथ शिंदेंवर एक विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे. एवढंच नाही तर त्याने ४५ मिनिटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने पुन्हा एकदा मोदी, भाजपा, एकनाथ शिंदे, मुकेश अंबानी, सुधा मूर्ती या सगळ्यांची यथेच्छ खिल्ली उडवली आहे.