रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशांवरच नाही तर जगभरात होत आहेत. जनजीवनासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये या युद्धाचे परिणाम जाणवू लागले आहेत. नेटफ्लिक्सने रशियातल्या काही कार्यक्रमांवरचं काम थांबवलं आहे, रशियातल्या मांजरींवरही बंदी घालण्यात आली आहे. या युद्धाचा अजून एक परिणाम म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या एका जुन्या मालिकेची लोकप्रियता कमालीची वाढत आहे.
२०१५ मध्ये, पूर्वीचे अभिनेते आणि कॉमेडियन आणि आताचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ‘सर्वंट ऑफ द पीपल’ या मालिकेत व्हॅसिली पेट्रोविच गोलोबोरोडको या हायस्कूलच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या शिक्षकाचा भ्रष्टाचाराला विरोध करतानाचा व्हिडीओ त्याचाच एक विद्यार्थी व्हायरल करतो, ज्यामुळे या शिक्षकाला राष्ट्राध्यक्ष पद मिळते. गोलोबोरोडको सामान्य जीवन जगत, आपले नेता होण्याचे फायदे नाकारून देश चालवतो.
/युद्धविषयक लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
युक्रेनमध्ये प्रचंड हिट झालेली ही तीन सीझन असलेली मालिका झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अधिक लोकप्रिय झाली आणि आता युद्धकाळात तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. झेलेन्स्की स्टुडिओज या कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदार निकोला सॉडरलंड यांनी गेल्या काही दिवसात या मालिकेच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाल्याचं सांगितलं. खरंतर ही खूप जुनी मालिका आहे, मात्र आत्ताची परिस्थिती पाहता ती सर्वांसाठीच खूप मनोरंजक ठरत आहे, असंही निकोला म्हणाले.