पॅरिस वेधशाळेचे संशोधन
लव्हजॉय हा धूमकेतू त्याच्या नावाप्रमाणेच आनंददायी असून तो मोठय़ा प्रमाणात म्हणजे सेकंदाला मोठय़ा प्रमाणात अल्कोहोल अवकाशात फेकत असतो. एकूण ५०० वाईनच्या बाटल्या तयार करता येतील इतके अल्कोहोल सेकंदाला बाहेर टाकले जाते, असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे.
अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये जे एथिल अल्कोहोल असते तेच या धूमकेतूमधून बाहेर पडते. या निरीक्षणानुसार धूमकेतू हे गुंतागुंतीच्या कार्बनी रेणूंचा स्रोत आहेत. पॅरिस वेधशाळेचे निकोलस बिव्हर यांनी म्हटले आहे की, लव्हजॉय हा धूमकेतू सेकंदाला मोठय़ा प्रमाणात अल्कोहोल बाहेर टाकतो व ते ५०० बाटल्या वाइन तयार करण्यास पुरेसे असते, पण हे धूमकेतूवरील क्रिया पूर्ण भरात असताना घडत असते. बिव्हर यांच्या नेतृत्वाखालील चमूने केलेले संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यांना २१ विविध कार्बनी रेणू या धूमकेतूत सापडले असून धूमकेतूमधून जे वायू सोडले जातात त्यात एथिल अल्कोहोल व ग्लायकोलाल्डेहाईड ही साध्या स्वरूपातील साखर बाहेर टाकली जाते. धूमकेतू हे आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीनंतर उरलेले अवशेष आहेत. सौरमाला कशी तयार झाली असावी याची माहिती मिळण्याकरिता धूमकेतूंचे संशोधन आवश्यक असते. अनेक धूमकेतू हे सूर्याच्या कक्षेपासून लांब फिरत असतात गुरुत्वीय बलामुळे धूमकेतू सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांच्यातील वायू बाहेर फेकला जातो. त्यामुळे धूमकेतूंचे घटक वैज्ञानिकांना ओळखता येतात.
लव्हजॉय हा धूमकेतू (सी २०१४ क्यू २) या नावाने नोंदणी झालेला असून तो सर्वात प्रखर आहे. १९९७ मध्ये दिसलेल्या हेल-बॉप धूमकेतू सारखाच तो क्रियाशीलही आहे. या वर्षी ३० जानेवारीला लव्हजॉय धूमकेतू सूर्याजवळून गेला होता व त्यावेळी त्याने सेकंदाला २० टन इतक्या वेगाने पाणी बाहेर टाकले होते. त्यावेळी या धूमकेतूचे निरीक्षण करण्यात आले होते व मायक्रोवेव्हमुळे निर्माण होणारी चमक त्याच्याभोवती सिएरा नेवाडा या स्पेनमधील ठिकाणी असलेल्या पिको व्हेलेटा रेडिओ दुर्बीणीतून दिसली होती. अनेक कंप्रतांचे विश्लेषण एका वेळी शक्य असल्याने या संशोधकांना कमी निरीक्षण काळातही धूमकेतूतील अनेक रेणूंची माहिती मिळाली होती. लव्हजॉय धूमकेतूत गुंतागुंतीचे कार्बनी रेणू असून इतर धूमकेतूंमध्येही ते आढळतात. धूमकेतूंचे रसायनशास्त्र गुंतागुंतीचे असते, असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या श्रीमती स्टीफनी मिलम यांनी सांगितले.