आयसिस या दहशतवादी संघटनेकडून शुक्रवारी २२ मिनिटांची एक ध्वनिचित्रफीत जारी करण्यात आली. या ध्वनिचित्रफीतीमध्ये आयसिसमधील पाच दहशतवाद्यांच्या मुलाखती दाखविण्यात आल्या आहेत. या पाचजणांमध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ठाण्यातून पळून गेलेल्या फाहद तन्वीर शेख याचाही समावेश आहे. फाहद २०१४ मध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी सिरीयाला पळून गेला होता. मात्र, आता आपण अबू अमर अल-हिंदी असे टोपणनाव धारण केल्याचे फाहदने त्याच्या मुलाखतीत म्हटले आहे. आम्ही परत येऊ. मात्र, त्यावेळी आमच्या हातात तलवार असेल, आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ, असे फाहदने या व्हिडिओत म्हटले आहे. याशिवाय, त्याने गेल्यावर्षी बॉम्बहल्ल्यात मारल्या गेलेला त्याचा मित्र शहीम टंकी यालाही श्रद्धांजली वाहिली. फाहद, शहीम आणि आरिब माजिद हे तिघेजण ठाण्यात राहणारे असून २०१४ मध्ये ते आयसिसमध्ये सामील होण्यासाठी घरातून पळून गेले होते. यापैकी आरिब माजिद हा काही दिवसांपूर्वी भारतात परतला असून सध्या ‘एनआयए’कडून त्याची चौकशी सुरू आहे. सुमारे २२ मिनिटांचा व्हिडिओ अरबी भाषेमध्ये आहे. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना यातून इशारा देण्यात आला आहे.
बाबरी आणि गुजरात दंगलीचा सूड घेऊ; ‘आयसिस’च्या व्हिडिओत ठाण्यातून पळून गेलेल्या तरूणाची धमकी
आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ, असे फाहदने या व्हिडिओत म्हटले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 21-05-2016 at 09:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coming to avenge babri kashmir gujarat muzaffarnagar isis video