Commercial LPG Cylinder Rate: गेल्या काही महिन्यांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरांमुळे ग्राहक वर्गाची चिंता वाढवली होती. या चिंतेमध्ये इतर जीवनावश्यक गोष्टींसह सर्वच गोष्टींची महागाई हाही लोकांसाठी चिंतेचा विषय झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडर्सच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. ही दरकपात १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडर्ससाठी लागू असेल. सरकारने दरांचा आढावा घेतल्यानंतर सिलिंडरच्या दरांमध्ये तब्बल १७१.५० रुपयांची कपात जाहीर केली आहे. यामुळे व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी घरगुती सिलिंडर्सच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
कधीपासून लागू झाली दरकपात?
जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, १ मे अर्थात आजपासूनच ही दरकपात लागू होणार आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये दरकपातीनंतर सिलिंडर आता १८५६.५० रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी मुंबईत हे दर १८०८.५० रुपये इतके असतील, तर कोलकातामध्ये १९६०.५० रुपयांना व्यावसायिक वापराचे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. दरकपातीआधी या शहरांमध्ये सिलिंडर्सच्या किमती अनुक्रमे २०२८ रुपये, १९८० रुपये आणि २१३२ रुपये इतक्या होत्या.
ऑईल मार्केटिंग कंपन्या अर्थात OMC नी मार्च महिन्यात १९ किलोच्या सिलिंडर्सची किंमत तब्बल ३५०.५० रुपयांनी वाढवली होती, तर घरगुती वापराच्या सिलिंडर्सच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर ही पहिली दरकपात करण्यात आली आहे.