प्रजासत्ताक दिनी प्रसिद्ध झालेल्या सरकारी जाहिरातीतील छायाचित्रात ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष’ हे शब्द नसलेल्या सरनाम्याचे छायाचित्र वापरले गेल्यामुळे केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका झाली. मात्र ‘धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाशी असलेली सरकारची बांधिलकी कायम आहे. आणि राज्यघटनेच्या सरनाम्यातून हे शब्द वगळण्याचा सरकारचा विचार नाही’ असा खुलासा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व भारतीयांच्या रक्तातच असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष’ हे शब्द समाविष्ट करण्यापूर्वीचे राज्यघटनेच्या सरनाम्याचे छायाचित्र प्रजासत्ताक दिनाच्या जाहिरातीत वापरले गेले होते. त्यातच केंद्राचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने हे शब्द वगळण्याची मागणीही केली होती. त्यामुळे केंद्र सरकारवर सर्व बाजूंनी टीकेचा भडीमार केला जात होता. या पाश्र्वभूमीवर नायडू पत्रकारांशी बोलत होते. नवनवीन वाद उकरून काढण्याची काही लोकांना सवयच जडलेली असते. आण्विक शिष्टाई ही केवळ राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊनच केली गेली. त्यासाठी अनेक तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली होती, असे वेंकय्या नायडू यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

धर्मनिरपेक्षतेशी आमची बांधिलकी कायम आहे. हे मूल्य सरनाम्यातून वगळण्याचा सरकारचा मानस नाही. किंबहुना भारतीय नागरिकांच्या रक्तातच धर्मनिरपेक्षता आहे. राज्यघटनेच्या मूळ सरनाम्यामध्ये हे शब्द नव्हते. आणीबाणीच्या कालखंडात या शब्दांचा समावेश ४२ व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. मात्र, सरकारी जाहिरातीत मूळ सरनाम्याचे छायाचित्र वापरले गेले.
– एम. वेंकय्या नायडू

Story img Loader