‘राष्ट्रीय छात्र सेना’ म्हणजे ‘एनसीसी’मध्ये दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी, या युवा शक्तीचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग व्हावा यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी संरक्षण विभागाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. १४ सदस्यांची समिती असून या समितीचे अध्यक्ष माजी खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे अशा प्रमुख सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.
देशांत ज्युनियर ( शालेय स्तर ) आणि सिनियर ( महाविद्यालय ) अशा दोन स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे १० लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सामाजिक आणि नागरी कर्तव्ये याची जाणीव राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांना विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून करुन दिली जाते. याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्यात सैन्य दलांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देत सैन्य दलाची तोंड ओळख करुन दिली जाते.
Ministry of Defence constitutes High-Level Expert Committee for a comprehensive review of National Cadet Corps
▪️Committee to suggest measures to empower NCC cadets to contribute more effectively towards nation building@DefenceMinIndia
Read here: https://t.co/cSPFjS9mBI
— PIB India (@PIB_India) September 16, 2021
आंतरराष्ट्रीय स्तरावर युवकांसाठी असलेला उपयुक्त कार्यक्रम, सुधारणा यांचा समावेश छात्रेसेनेच्या अभ्यासक्रमात करण्याबाबात ही समिती उपाययोजना सुचवणार आहे. तसंच राष्ट्रीय छात्र सेनेचा दर्जा उंचावण्यासाठी छात्रसेनेच्या माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्याबाबतही ही समिती सुचना करणार आहे. या समितीचा कार्यकाल किती दिवसांचा असेल हे मात्र संरक्षण दलाने स्पष्ट केलेलं नाही.