पीटीआय, नवी दिल्ली
वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) काही विद्यार्थ्यांना दिलेल्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव (ग्रेस) गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘नीट’ परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली होती. आम आदमी पक्षानेही या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. या निकालामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र सरकारने ही परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) या विद्यार्थी संघटनेने सीबीआय चौकशीची मागणी केली. राजकीय पक्ष व विविध संघटनांकडून होत असलेल्या आरोपानंतर शनिवारी केंद्रीय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्याकंन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती ‘एनटीए’चे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी दिली.
हेही वाचा >>>काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड; मल्लिकार्जून खरगेंचा प्रस्ताव एकमताने मंजूर!
उच्चस्तरीय समिती १५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन करेल. पुढील आठवड्यात ही समिती आपल्या शिफारसी सादर करेल आणि विद्यार्थ्यांचे निकाल सुधारले जातील. वाढीव गुण देण्यामुळे परीक्षेच्या पात्रता निकषांवर परिणाम झालेला नाही आणि प्रभाविक उमेदवारांच्या निकालांच्या पुनर्मूल्यांकनाचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार नाही.-सुबोध कुमार सिंह, महासंचालक, ‘एनटीए’
●‘नीट’ परीक्षेतील १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन.
●समितीमध्ये चार सदस्य. समितीचे अध्यक्ष केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष असतील.
●‘नीट’ परीक्षेमधील निकालांच्या संभाव्य विसंगतींचे परीक्षण समितीचे सदस्य करतील.
●या समितीकडून पुढील आठवड्यात आपले निष्कर्ष सादर करणे अपेक्षित आहे.