पीटीआय, नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, विचारवंत एम एम कलबुर्गी आणि कार्यकर्त्यां पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये काही ‘समान धागा’ होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला केली.

डॉ. दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालाने १८ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणी न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झाली. उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिलेल्या आदेशात डॉ. दाभोलकर हत्येच्या तपासावर सतत देखरेख ठेवण्यास नकार दिला होता.

डॉ. दाभोलकर यांची हत्या २१ ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात   झाली होती. पानसरे यांची हत्या २० फेब्रुवारी २०१५ रोजी, कलबुर्गी यांची हत्या ३० ऑगस्ट २०१५ रोजी आणि गौरी लंकेश यांची हत्या ५ सप्टेंबर २०१७ रोजी झाली होती. या चारही हत्यांमागे मोठे कारस्थान असल्याचे मुक्ता दाभोलकर यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. उपलब्ध पुराव्यांवरून या हत्या एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात असे दिसते आणि मुक्ता यांनी हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर उपस्थित केला होता. 

तपास करण्याचा आदेश

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचा या चार हत्यांशी संबंध नाही, असे तुम्हाला वाटते ना, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महान्यायअभिकर्ता ऐश्वर्या भाटी यांना केला. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे, त्याचा तपास करा असे न्या. कौल यांनी सीबीआयला सांगितले.

Story img Loader