नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने सोमवारी २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (कॉमनवेल्थ गेम्स) आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी, तत्कालीन सचिव ललित भानोत आणि इतरांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारत १३ वर्षे जुन्या प्रकरणावर पडदा टाकला. अहवाल स्वीकारल्याने १५ वर्षांपूर्वीच्या कथित घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराची किनारही यामुळे संपुष्टात आली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देशात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणात अनेक गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे खटले दाखल झाले, ज्यामध्ये सध्याच्या खटल्याचाही समावेश होता. कलमाडी आणि इतरांवर पुरस्कार आणि खेळांसाठी दोन महत्त्वाचे कंत्राट देण्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप होता.

‘सीबीआय’ने भ्रष्टाचाराचा खटला आधीच बंद केला होता, ज्याच्या आधारे ‘ईडी’ने नंतर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आणि अहवाल स्वीकारला. यामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची आयोजन समिती, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) विजय कुमार गौतम, तत्कालीन कोषाध्यक्ष ए. के. मॅटो, इव्हेंट नॉलेज सर्व्हिस (ईकेएस), स्वित्झर्लंड आणि ‘सीईओ’ क्रेग गॉर्डन मेलाचे यांची नावेही होती, असे विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी नमूद केले.

ईडीने गुप्त तपास करूनही त्यांच्याकडून ‘पीएमएलए’च्या कलम-३ अंतर्गत कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा तो करण्यात आलेला नाही. सध्याच्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालानुसार पुढे जाण्यात कोणतेही कारण नाही, परिणामी ईडीने दाखल केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारला जात आहे, असे न्यायाधीशांनी नमूद केले.

सीबीआयचा आरोप काय?

‘सीबीआय’च्या मते, ‘गेम्स वर्कफोर्स सर्व्हिस’ आणि गेम्स प्लॅनिंग, प्रोजेक्ट अँड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस आदींमध्ये स्पर्धेशी संबंधित कामांचे करार होते. आरोपींनी जाणूनबुजून आणि चुकीच्या पद्धतीने दोन्ही कंत्राटे देऊन ‘ईकेएस’ आणि ‘अर्न्स्ट अँड यंग’ यांच्या संघाला अनावश्यक आर्थिक फायदा मिळवून दिला, त्यामुळे आयोजन समितीचे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप ‘सीबीआय’ने केला होता.

मोदी, केजरीवालांनी देशाची माफी मागावी काँग्रेस

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने ईडी ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारल्याने या घोटाळ्याच्या प्रकरणावर पडदा पडला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी देशाची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.