कानठळ्या बसवणारा एक आवाज आला. अन् क्षणार्धात तीन गाडय़ा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, असे बंगळुरू स्फोटाच्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
ज्या दुचाकीवर स्फोटके ठेवली होती, तिच्या समोरच्याच पोलिसांच्या गाडीत आम्ही बसलो होतो. एक कानठळया बसविणारा आवाज आमच्या कानी आला आणि काही समजायच्या आतच तीन गाडय़ा जळून खाक होताना आम्ही पाहिल्या, अशी माहिती ५० वर्षीय मीरान्नवर यांनी दिली.
आमच्या गाडीचेही अतोनात नुकसान झाले, खिडकीच्या काचांची तावदाने फुटली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की मी गाडीच्या छतावर आदळलो, असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जखमी पोलिसाने सांगितले.
रक्षिता आणि लीक्षा या दोन मुली शिकवणी घेऊन आपापल्या घरी परतत होत्या. त्या आवाजाने आम्हाला काही कळायच्या आतच आम्ही खाली कोसळलो अन् जखमी झालो, असे या दोघींनी सांगितले.
इतक्या शांत परिसरात असा काही प्रकार घडेल यावर विश्वासच बसत नाही. अजूनही आम्ही या धक्क्य़ातून सावरत आहोत, असे तेथील ५० वर्षीय रहिवाशांनी सांगितले.
मी स्वयंपाकघरात काम करीत असताना, अचानक मोठा आवाज झाला आणि खिडकीची तावदाने फुटली, ज्यात मी जखमी झाले, असे एका गृहिणीने सांगितले.
या स्फोटामुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट नारळाच्या झाडाच्या उंचीएवढे असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Story img Loader