Hazaribagh Stone Pelting: झारखंडमधील हजारीबागच्या झेंडा चौकात रामनवमीपूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गाणी वाजवण्यावरून मंगळवारी रात्री उशिरा परिसरात दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीती असलेल्या जामा मशिदीजवळ ही मिरवणूक पोहोचली तेव्हा मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांत दगडफेक आणि तोडफोडीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. असे असले तरी अद्याप या प्रकरणात कोणाचीही धरपकड किंवा कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
यावेळी परिस्थिती अस्थिर होऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई केली, लाठीमार केला आणि जमावाला पांगवण्यासाठी हवेत चार राउंड गोळीबारही करावा लागला.
६ एप्रिल रोजी रामनवमी असल्याने, शेकडो आखाड्यांनी दर मंगळवारी “मंगल मिरवणूक” काढायला सुरुवात केली आहे. परंपरेनुसार दरवर्षी होळीपासून रामनवमी उत्सवापर्यंत दर आठवड्याला ही मिरवणूक काढली जाते.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, हजारीबागच्या उपायुक्त नॅन्सी सहाय म्हणाल्या, “मिरवणुकीत वाजवलेल्या एका आक्षेपार्ह गाण्यामुळे वाद सुरू झाला, त्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक झाल्याने हा वाद आणखी वाढला. आम्ही पोलीस बळ तैनात केले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.”
पोलीस अधिक्षकांनी काय सांगितले?
या घटनेबाबत माध्यमांना माहिती देताना हजारीबागचे पोलीस अधीक्षक अरविंद सिंह यांनी सांगितले की, “परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु उत्सवादरम्यान कोणी उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील.”
“सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. काही दिवसांनी हिंदूंसाठी महत्त्वाचा असलेली रामनवीमी आहे. तर, पुढे आदीवासींचा सरहुल सणही जवळ येत असल्याने, आम्ही सर्व धार्मिक समुदायांना शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केल्याचे,” अरविंद सिंह यांनी सांगितले.
यंदा सुरक्षेत वाढ
येत्या काही दिवसांत येणाऱ्या विविध सणांसाठीच्या सुरक्षेच्या तयारीबाबत बोलताना अरविंद सिंह म्हणाले की, “रामनवमी उत्सवासाठी चोख तयारी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकीच्या गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आम्ही १५ ड्रोन कॅमेरे वापरत आहोत. प्रत्येक आखाड्यात पांढरे गणवेश परिधान केलेले अधिकारी उपस्थित असतील.”
दरम्यान या घटनेनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार संजय सेठ यांनी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारवर टीका केली आणि झारखंडमध्ये वारंवार हिंसाचार होत असल्याचा आरोप केला.