झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत येणारे काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-अपक्षांचे सरकार पुन्हा राज्याच्या जनतेला लुटणार असून त्यांच्याकडून जनहिताचे कोणतेही काम होण्याची सुतराम शक्यता नसल्याने झारखंड विधानसभा विसर्जित करून नव्याने जनादेश घेण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
झारखंड राज्याच्या निर्मितीपासूनच काँग्रेस, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी झारखंडच्या नैसर्गिक संपत्तीची लूट करण्याच्या उद्देशानेच धोरणे आखली. सहा महिन्यांपूर्वी अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वाखालील भाजप-झामुमो सरकारने झारखंडच्या विकासाची तमा न बाळगता लूट आणि प्रशासकीय हिंसेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. हे सरकार गडगडल्यानंतर भाकपसह अन्य डावे पक्ष व झारखंड विकास मोर्चाने विधानसभा भंग करून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली. पण केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाने आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी विधानसभा भंग होऊ दिली नाही. आता संधीसाधू झामुमो, कोटय़वधी रुपयांची लूट करून तुरुंगात पोहोचलेले मधु कोडा, माजी मंत्री एनोस एक्का, हरिनारायण राय आणि अन्य अपक्ष आमदारांच्या सहकार्याने काँग्रेस सरकार स्थापन करीत आहे. अर्जुन मुंडा मुख्यमंत्री असताना १०७ प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्यामुळे झारखंडची एकतृतीयांश जमीन देशविदेशातील औद्योगिक घराण्यांच्या घशात जाणार असून झारखंडच्या तीन कोटी जनतेपैकी सव्वा कोटी लोक विस्थापित होतील. काँग्रेस-झामुमो-अपक्षांचे सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या जनतेला लुटणार असून त्यांच्याकडून जनहिताचे काम होणार नसल्याचा दावा झारखंडचा प्रभार असलेले भाकपचे राष्ट्रीय परिषद सचिव अतुल अंजाना यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा