नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या या वाढीव सहभागामुळे, भांडवली बाजारातून गेल्या काही वर्षांत लक्षणीय संपत्ती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अंदाजानुसार, गेल्या पाच वर्षांत (सप्टेंबर २०२४ पर्यंत) देशांतर्गत गुंतवणूकदारांची संपत्ती ४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढली आहे. एकूणच, भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष (म्युच्युअल फंडांद्वारे) माध्यमातून वाढला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) मधील सक्रिय गुंतवणूकदारांनी १० कोटींचा टप्पा ओलांडला, जो गेल्या चार वर्षांत तिप्पट झाला आहे. सध्या तो १०.९ कोटींवर आहे. झिरोधा, ग्रो, फाइव्हपैसा आणि एंजल वन यासारख्या तंत्रज्ञानसुलभ गुंतवणूक मंचांमुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा बाजारातील टक्का वाढला आहे. डिमॅट खात्यांमध्ये सतत वाढ होत असून डिसेंबर २०२४ अखेरीस डिमॅट खात्यांची संख्या ३३ टक्क्यांनी वाढून १८.५ कोटी झाली आहे.
म्युच्युअल फंड उद्याोगाची भरारी
बचत आणि गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय असलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची संख्या आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २.९ कोटींवरून, डिसेंबर २०२४ पर्यंत दुप्पट झाली आहे. एकूण फोलिओची संख्या आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरीस १७.८ कोटींवरून, डिसेंबर २०२४ अखेरीस २२.५ कोटींवर पोहोचली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात १८.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
उच्च शिक्षण नियमनांत सुधारणा
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) हे भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत एक आदर्श बदल घडवून आणत असल्याचा उल्लेख करत, अहवालाने उच्च शिक्षण संस्थांना नवोपक्रम करण्यासाठी अधिक स्वायत्ततेची गरज अधोरेखित केली आहे. उच्च शिक्षण क्षेत्राला पुन्हा ऊर्जा मिळवून देण्यासाठी आणि ते भरभराटीला आणण्यासाठी नियामक प्रणालीत संपूर्ण सुधारणांची आवश्यकता आहे.