‘गंदा है, पर धंदा है’ हे वाक्य आपण आजवर अनेक चित्रपटांमधून किंवा आपल्या रोजच्या व्यवहारात ऐकलं असेल. आपला व्यवसाय चांगला चालावा, त्याची भरभराट व्हावी आणि अधिकाधिक ग्राहकांनी आपल्याकडेच यावं यासाठी सर्वच व्यावसायिक आणि व्यापक स्तरावर कंपन्यांचे मालक प्रयत्नशील असतात. मग यासाठी अनेकदा काही ‘वेगळ्या’ वाटा धुंडाळण्यालाही त्यांची ना नसते. पण बंगळुरूच्या एका महाशयांनी एक जगावेगळा पराक्रम करत चक्क प्रतिस्पर्धी कंपनीलाचा लाखोंचा चुना लावला. हा प्रकार उघड झाला, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला!
नेमकं झालं काय?
हा सगळा प्रकार बंगळुरूमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीत घडला. बरोबर चार वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये अमलुरपवराज नावाचा एक व्यक्ती या कंपनीत नोकरीला लागला. सिंगापूरमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीचं बंगळुरूमध्येही कार्यालय आहे. या कंपनीत अमलुरपवराज व्हेंडर मॅनेजमेंट मॅनेजर अर्थात दुसऱ्या शब्दांत कंपनीकडे येणाऱ्या ग्राहकांचं व्यवस्थापन करण्यासाठी रुजू झाला.
अमलुरपवराजच्या पार्श्वभूमीसंदर्भात पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या या कंपनीमध्ये सारंकाही सुरळीत चालू होतं. पण ऑगस्ट महिन्यात कंपनीला कळलं की त्यांचे बरेचसे ग्राहक हे दुसऱ्याच एका कंपनीकडे गेले आहेत. जेव्हा कंपनीतील वरीष्ठांनी याची सखोल माहिती काढली, तेव्हा कुठे हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
आपली कंपनी वाचवण्यासाठी…
तर त्याचं झालं असं, की अमलुरपवराज हा स्वत: अशीच सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीचा मालक आहे. २००३ साली त्यानं ही कंपनी स्थापन केली होती. पण गेल्या काही वर्षांत अमलुरपवराजला कंपनीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं. हे नुकसान कसं भरून काढायचं? हा प्रश्न अमलुरपवराजसमोर होता. शेवटी त्यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली. अमलुरपवराज त्याच्या एका बड्या प्रतिस्पर्धी कंपनीत स्वत:च व्हेंडर मॅनेजमेंट मॅनेजर म्हणून चक्क नोकरीला लागला!
त्याची पद्धत सोपी होती. समोरच्या कंपनीकडून ग्राहकांना ऑफर केल्या जाणाऱ्या गोष्टींची सविस्तर माहिती, तांत्रिक बारकावे आणि इतर विशिष्ट गोष्टी समजून घ्यायच्या. ती माहिती आपल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना पाठवायची. नंतर त्याची कंपनी त्या ग्राहकांना त्याच गोष्टी कमी दरात ऑफर करायच्या. त्यामुळे शेवटी ग्राहक अमलुरपवराजच्या कंपनीला ते काम द्यायच्या आणि त्याचा हेतू साध्य व्हायचा. असं करून अमलुरपवराज चक्क सिंगापूरमधल्याच एका बड्या मेंटल इंजिनिअरिंग कंपनीकडून मोठं काम मिळवलं होतं!
पोलीस मागावर, अमलुरपवराज पसार!
हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर या कंपनीनं थेट पोलिसांत धाव घेतली आणि आपल्याच कंपनीत दुसऱ्या कंपनीचा ‘अंडरकव्हर एजंट’ म्हणून चार वर्षांपासून नोकरी करणाऱ्या अमलुरपवराजविरोधात तक्रार दाखल केली. पण तोपर्यंत अमलुरपवराजच्या फरार झाला होता. आता पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.