Android Operating System in Smart TV: कोणताही प्रश्न, शंका किंवा माहितीसाठी इंटरनेटवर आलेली व्यक्ती सर्वात प्रथम जाते ती गुगलवर. गुगलकडे आपल्या जवळपास सगळ्या प्रश्नांवर काही ना काही माहिती उपलब्ध असतेच. इंटरनेटच्या विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या गुगलनं घराघरांत बसवल्या जाणाऱ्या स्मार्ट टीव्हींमध्येही आपली एकाधिकारशाही प्रस्थापित केली होती. जवळपास सगळ्याच कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हींमध्ये गुगलचीच ऑपरेटिंग सिस्टीम असणं ही आत्तापर्यंत अगदी साहजिक बाब होती. पण आता त्यात बदल होणार असून गुगल स्मार्ट टीव्हींमधून हद्दपार होण्याची शक्यता आहे!
नेमकं प्रकरण काय?
आजकाल अनेक घरांमध्ये स्मार्ट टीव्ही पाहायला मिळतात. आपल्या मोबाईल फोनमध्ये असते, तशीच ऑपरेटिंग सिस्टीम या टीव्हींमध्येही असते. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे त्यातील फीचर्स आपण कशा पद्धतीने वापरू शकतो, याची एक व्यवस्था! मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि अँड्रॉईड या सामान्यपणे मोबाईल फोनमध्ये येणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. पण मोबाईल विश्वात दिसणारं हे किमान वैविध्यही स्मार्ट टीव्हींमध्ये दिसत नाही इतकी गुगलची एकाधिकारशाही या बाबतीत निर्माण झाली आहे. जवळपास प्रत्येक स्मार्ट टीव्हीमध्ये गुगलची अँड्रॉईड ही ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करूनच हे टीव्ही विकले जातात! टीव्हीवर नवे अॅप डाऊनलोड करण्यासाठी फोनप्रमाणेच आपल्याला गुगल प्लेस्टोअरवर जावं लागतं!
गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेटविरोधात CCI अर्थात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. भारतीय बाजारपेठेत व्यावसायिक स्पर्धा टिकून राहावी, यासंदर्भातलं नियमन या केंद्रीय संस्थेकडून केलं जातं. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सीसीआयनं गुगलला ही एकाधिकारशाही संपवण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
CCI नं गुगलला फटकारलं!
सीसीआयनं सुनावणीदरम्यान गुगलला फटकारलं. भारतातील स्मार्ट टीव्ही क्षेत्रात अशा प्रकारे एकाधिकारशाही प्रस्थापित करणं हे स्पर्धात्मकतेच्या विरोधातील वर्तन आहे, असं सीसीआयनं नमूद केलं. भारत ही गुगलसाठी जगभरातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. इथे गुगलकडून स्मार्ट टीव्ही कंपन्यांशी करार करण्यात आले असून त्यानुसार स्मार्ट टीव्हींमध्ये आधीपासूनच अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम, गुगल प्ले स्टोअर आणि त्यासंदर्भातले इतर अॅप इन्स्टॉल करून देणे बंधनकारक करण्यात आलं आहे. असं करणं म्हणजे बाजारपेठेतील आपल्या बळकट स्थानाचा गैरवापर करणं असल्याचंही सीसीआयनं नमूद केलं.
आता स्मार्ट टीव्हींमधून गुगल खरंच हद्दपार होणार?
गुगलनं अशा प्रकारे टीव्ही कंपन्यांशी करार करणं हे इतर छोट्या कंपन्यांना पर्यायी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचाच एक भाग आहे, असं सीसीआयनं नमूद केलं. या पार्श्वभूमीवर गुगलनं स्मार्ट टीव्हींवरील आपल्या सेवांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता प्लेस्टोअर, प्ले सर्व्हिसेस किंवा इतर सुविधांसाठी एकत्र एक पॅकेज म्हणून परवाना न देता प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र परवाने दिले जातील, असं आश्वासन गुगलनं दिलं आहे.
याशिवाय, आता गुगलकडून स्मार्ट टीव्हींवर मोफत दिल्या जाणाऱ्या या सेवांसाठी पैसे आकारणार असल्याचंही गुगलनं नमूद केल्याचं एनडीटीव्हीच्या या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता स्मार्ट टीव्हीवर गुगलच्या सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे भरावे लागण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त भारतात अँड्रॉईड स्मार्ट टीव्हींची विक्री करणाऱ्या कंपन्यांना आता गुगलची अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच टीव्हीमध्ये इन्स्टॉल करणं बंधनकारक नसल्याचं पत्र गुगलनं पाठवावं, असेही निर्देश सीसीआयनं दिले आहेत.
ग्राहकांनी काय करावं?
दरम्यान, आता ग्राहकांना स्मार्ट टीव्ही खरेदी करताना कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या टीव्हीमध्ये आहेत, यासंदर्भात विचारणा करावी लागणार आहे. कारण आता स्मार्ट टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांना इतर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्याचीही परवानगी असेल.
मात्र, सध्या गुगल प्ले स्टोअर व अॅमेझॉन अॅप स्टोअर्सवर उपलब्ध असणारे सगळे अॅप इतर ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी स्मार्ट टीव्ही खरेदी करताना कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर कोणते अॅप आहेत यासंदर्भात पुरेशी माहिती घेतल्यानंतरच खरेदीसाठी जावं लागणार आहे.