लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर, मंत्रिपदासाठी घटक पक्षांमध्ये चुरस सुरू झाली आहे. महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही प्रत्येकी एक केंद्रीय मंत्रिपद व एक राज्यमंत्रीपद अशा किमान दोन मंत्रिपदाची मागणी केल्याचे समजते.

‘एनडीए’च्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये फडणवीस यांच्या राजीनामाच्या प्रस्तावासह मंत्रिपदे व राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आदी मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. शिंदे व पवार यांनीही शहांची भेट घेऊन मंत्रिपदांची अपेक्षा व्यक्त केली. शहांनंतर या दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. शिंदे व पवार गटाने किमान दोन मंत्रिपदांची मागणी केली असली तरी, पवार गटाला एक केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यामुळे या गटाचे राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांना एनडीएच्या नव्या सरकारमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाची दोन मंत्रिपदाची मागणी मान्य केली जाऊ शकते. चार खासदारांच्या मागे एक मंत्रिपद हे सूत्र लागू केले तर शिंदे गटाला केंद्रीय तसेच राज्य मंत्रिपद देता येऊ शकते. शिंदे गटाकडे सात खासदार असून ‘एनडीए’तील तेलुगु देसम व जनता दलानंतर (सं) सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाने अवजड उद्याोग मंत्रालयाची मागणी केली आहे.

हेही वाचा >>>मेमध्ये १.५ अंश तापमानवाढ; भारतातील आतापर्यंतची सर्वात तीव्र उष्णतेची लाट

मोदींना शिंदेअजितदादांचा पाठिंबा

‘एनडीए’च्या नेतेपदी नरेंद्र मोदी निवड करण्याच्या राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला घटक पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता. व्यासपीठावर मोदींच्या शेजारी चंद्रबाबू नायडू व नितीशकुमार यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिंदेंना स्थान देण्यात आले होते. मोदींच्या दुसऱ्या बाजूला राजनाथ सिंह व अमित शहा यांच्यानंतर अजित पवार यांना स्थान दिले गेले. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, हा ऐतिहासिक क्षण आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला पुढील पाच वर्षांत आणखी गती मिळेल, असे मत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition for ministerial posts among component parties amy
Show comments