वाराणसी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात खासदार-आमदार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर ऊर्फ गोळवलकर गुरूजी यांच्याविषयी दिग्विजय सिंह यांनी समाजमाध्यमांत वादग्रस्त आणि दिशाभूल करणारा तपशील दिल्याच्या आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
भाजपच्या काशी प्रदेश विधि शाखेचे संयोजक आणि वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश अलका यांच्या न्यायालयात शनिवारी या प्रकरणाबाबत अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने जबाब-पुरावे नोंदवण्यासाठी १८ जुलैची तारीख निश्चित केली आहे.
त्रिपाठी यांनी आरोप केला आहे की दिग्विजय यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावर गोळवलकर गुरुजींबद्दल तथ्यहीन-बनावट छायाचित्रे आणि दिशाभूल करणारी खोटी माहिती प्रसृत करून सामाजिक द्वेष निर्माण केला आणि संघाची प्रतिमा डागाळली. समाजात तेढ निर्माण करणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा डागाळण्यासाठीच दिग्विजय सिंह जाणूनबुजून हा अपप्रचार करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.