President Droupadi Murmu : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अडचणीत आल्या आहेत. त्यांच्याविरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ‘Poor Lady’ असे विधान केल्यामुळे सोनिया गांधी यांच्याविरुद्ध शनिवारी बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुझफ्फरपूर येथील वकील सुधीर ओझा यांनी सोनिया गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली आणि राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी केली आहे.

वकीत सुधीर ओझा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वढेरा यांनाही सह-आरोपी करावे असे म्हणत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. “सोनिया गांधी यांनी ‘Poor Lady’ अशी टिप्पणी करून राष्ट्रपती मुर्मू यांचा अपमान केला आहे,” असे ओझा यांनी मुझफ्फरपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. हा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक अधिकाराचा अपमान आहे. यामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सह-आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काय म्हणाल्या होत्या सोनिया गांधी?

या प्रकरणी आता न्यायालय १० फेब्रुवारी रोजी सुनावणी करणार आहे. खरं तर, संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, सभागृहाबाहेर पत्रकारांनी सोनिया गांधींना राष्ट्रपती मुर्मू यांच्या एक तासाच्या भाषणाबद्दल विचारले होते. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या, ‘राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या. फारच वाईट’. सोनियांच्या या निरीक्षणाला राहुल गांधी यांनी दुजोरा दिला होता. राष्ट्रपती यांनी भाषणात तेच तेच मुद्दे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले होते.

राष्ट्रपती कार्यालयातून उत्तर

सोनिया गांधी यांनी केलेल्या या विधानाला राष्ट्रपती कार्यालयातूनही उत्तर देण्यात आले आहे. सोनिया गांधींचे विधान अस्वीकार्य आहे, असे राष्ट्रपती कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

भाजपाची टीका

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या या टीकेवर भाजपानेही प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीचा अपमान केल्याचे भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले. ते म्हणाले, “या टीकेमुळे राजकारणातील गटार आणि काँग्रेसचे चारित्र्य उघड झाले आहे. गांधी कुटुंबाबाहेरील कोणी उच्च संवैधानिक पदांवर विराजमान होऊ शकते ही बाब गांधी कुटुंब सहन करू शकत नाही. हा अपमान प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे, प्रत्येक आदिवासीचा अपमान आहे, प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. हा देश हे सहन करणार नाही”, असं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले होते.

Story img Loader