शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टद्वारा संचलित साईबाबा मंदिराच्या प्रमुखाविरोधात एका भाविक महिलेने छेडछाड आणि विनयभंगाची तक्रार शुक्रवारी पोलिसांत दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंत संबंधीत आरोपी फरार झाला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

शिर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी बी. एफ. माघाडे यांनी सांगितले की, साई मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिर्डीजवळ्याच एका गावातील भाविक महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यापासून जगताप हा शिर्डीतून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, साई संस्थान ट्रस्टच्या प्रवक्त्यांशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. पोलीस याबाबत चौकशी करीत असल्याने यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे. ‘मिड डे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडित महिला गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मित्र परिवारासोबत साईबाबांच्या पालखी सोहळ्यासाठी मंदिर परिसरात गेली होती. त्यानंतर मंदिरात प्रार्थना करताना जगताप या महिलेच्या अगदी जवळ आला. त्यानंतर त्याने तिला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करीत पकडले आणि शिवागाळही केली. तसेच तिला मंदिर परिसरातून बाहेर हाकलून दिले. तसेच पुन्हा मंदिर परिसरात दिसायचे नाही अशी धमकीही दिली. जगतापने यापूर्वीही अनेकदा अशाच प्रकारे इतर महिलांशी देखील वर्तन केले आहे. त्यामुळे शिर्डी संस्थान ट्रस्टने जगातपची प्रमुख प्रभारी पदावरुन हाकालपट्टी करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. वंदना सोनुने या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखील या प्रकरणाची चौकशी शिर्डी पोलिसांनी सुरु केली आहे. मात्र, काल रात्रीपासूनच जगताप हा शिर्डीतून फरार झाला आहे.

शिर्डी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि श्रीमंत देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी हजेरी लावतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झालेल्या साई बाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाची गेल्या महिन्यांत सांगता झाली. त्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांसह अनेक मान्यवरांनी या मंदिराला भेटी दिल्या.

Story img Loader