पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘विषारी’ टीका केल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात भाजपने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली. खरगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून प्रतिबंधित करण्याची मागणी भाजपने केली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, ‘खरगे यांची टीप्पणी केवळ जीभ घसरली नसून काँग्रेसच्या द्वेषपूर्ण राजकारणाचा भाग आहे. त्यांनी असंतोष पसरवण्याचे आणि चिथावणी देण्याचे काम केले आहे.’ भाजपने भादंविच्या कलम ४९९, ५०० आणि ५०४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
अमित शहा यांची टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. काँग्रेसकडे मुद्दय़ांचा अभाव आहे. मात्र पंतप्रधानांविरोधात जेवढे वाईट बोलाल, तेवढा त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत जाईल.
‘विषकन्या’ उल्लेख
भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख ‘विषकन्या’ असा केला. काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला असून या आमदाराची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
राहुल गांधी यांचे आश्वासन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, राज्यात सत्ता आल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीस एक कोटी रुपये आणि कल्याण कर्नाटक प्रदेशासाठी ५,००० कोटी रुपये दिले जातील. जेवर्गी येथे जाहीर सभेला राहुल यांनी संबोधित केले.
मोदी आज, उद्या कर्नाटक दौऱ्यावर
बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार व रविवार असे दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सहा जाहीर सभा घेतील, तर दोन रोड शो करणार आहेत, अशी माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली. मोदी शनिवारी सकाळी दिल्लीहून विशेष विमानाने बिदर विमानतळावर जातील आणि तेथून ते हेलिकॉप्टरने बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेला संबोधित करतील. या सभेनंतर ते विजयपुरा येथे रवाना होतील. तिथे ते दुपारी १ वाजता एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील. त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील कुडाची येथे दुपारी २.४५ वाजता ते सभा घेणार आहेत.